विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करावं – सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शाहू ग्रुपमधील सभासद - कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रेरणा दिली. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू ठेवण्यात आली असून, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वात त्याला बळ मिळाले आहे. याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करावं असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना सेवकांच्या पंतसंस्थेतर्फे सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारवेळी त्या बोलत होत्या.
घाटगे पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेत आई-वडील, कारखाना, पतसंस्था व शाहू ग्रुपचे नाव उज्वल करावे यासाठी अशी प्रोत्साहनपर योजना उपयुक्त ठरत आहे.
पतसंस्थेचे चेअरमन व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले," शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस वर्षांपूर्वी कर्मचारी सभासदांच्या मुलांना प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने सभासद कल्याण निधीतून ही शैक्षणिक योजना सुरू केली आहे.
कार्यक्रमात दहावीतील रेणू पाटील, गायत्री वाडकर, संस्कृती पाटील, श्रावणी पाटील व बारावीतील दिव्या गुरव, अथर्व चौगुले, समर्थ पाटील यांचा सत्कार सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
सचिव धोंडीराम पाटील यांनी स्वागत तर विजयकुमार चौगुले यांनी आभार मानले.
यावेळी संचालक मंडळ,अधिकारी, कर्मचारी व पालक उपस्थित होते.