अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’ का सोडला? नेमकं कारण काय..?
मुंबई - ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या २२ दिवसांत तब्बल ६५० कोटींची कमाई केली असून, वर्ल्डवाईड कलेक्शन १००० कोटींच्या पुढे गेले आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले असले, तरी खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. दरम्यान, ‘दृश्यम 3’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय खन्नाने हा चित्रपट करण्यास नकार दिल्यामुळे निर्माते नाराज असल्याची चर्चा आहे. एकीकडे अक्षयने आपली फी वाढवल्याने वाद निर्माण झाल्याचे बोलले जात असताना, दुसरीकडे विग वापरण्याच्या अटीमुळे त्याने चित्रपट सोडल्याचेही सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’ साठी तब्बल २१ कोटी रुपयांची मागणी केली होती. सोशल मीडियावर अनेक नेटकरी अक्षयच्या बाजूने उभे राहत, तो याहून अधिक फीचा हकदार असल्याचे मत व्यक्त करत आहेत. निर्माता कुमार मंगत पाठक यांनी अक्षयसोबत आधीच करार केला होता. अक्षयने अॅडव्हान्स घेतले होते आणि स्क्रिप्टचे कौतुकही केले होते. मात्र, ‘दृश्यम 2’ मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी विग वापरण्याच्या मुद्द्यावरून त्याने तिसऱ्या भागातून माघार घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाची सलगता तुटली आहे, कारण ‘दृश्यम 3’ची सुरुवात त्याच पात्रापासून होणार होती.
कुमार मंगत पाठक यांनी फी वाढवण्याच्या अफवा फेटाळून लावत, ‘धुरंधर’ च्या यशानंतर अक्षयच्या वागण्यात बदल झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी असेही सांगितले की, ‘दृश्यम’ पूर्वी अनेक वर्षे अक्षयकडे काम नव्हते. आता या भूमिकेसाठी जयदीप अहलावत यांची निवड होण्याची शक्यता असून, चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये अजय देवगन आणि इतर कलाकारांसोबत सुरू होणार आहे. तसेच, निर्माते कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचीही माहिती आहे.
एका मुलाखतीत कुमार मंगत पाठक यांनी स्पष्ट केले की, ‘दृश्यम 2’ मध्ये अक्षय खन्ना विगविना दिसला होता आणि तिसऱ्या भागातही त्याच लूकची गरज होती. सुरुवातीला अक्षय यासाठी तयार होता. मात्र, नंतर काहींच्या सल्ल्यामुळे त्याने पुन्हा विग वापरण्याची मागणी केली. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी सुरुवातीला होकार दिला, पण अखेरीस अक्षयनेच चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.




