उद्धव ठाकरेंनी केलं भाजपबद्दल सूचक विधान

मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चा 59 वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना, ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता चर्चेत आहे. मात्र, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडेच एका हॉटेलमध्ये झालेली बैठक या चर्चेला वेगळं वळण देत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट हल्लाबोल करत, राज ठाकरेंबरोबर युतीबाबत सूचक आणि सकारात्मक संकेत दिले.
"ही लढाई माझी नाही, मराठी अस्मितेची आहे" -
ठाकरे पुढे म्हणाले, “ही केवळ माझी लढाई नाही. 1960 मध्ये मराठी माणसाने जे बलिदान दिलं, त्याच्या शपथेवर आपण मुंबईवर आपला हक्क कायम ठेवणार आहोत. मुंबईचं महत्त्व कमी होऊ देणार नाही.”
भाजप आणि उद्योगपती अदाणी यांच्यावर नाव न घेता टीका करत ठाकरे म्हणाले, “मालकांचे नोकर आता गुप्त बैठकांमध्ये मराठी माणसाची एकजूट तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना भीती वाटते की मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या हातात जाईल. त्यामुळेच अदाणीसारख्या लोकांचे हित जपण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत.”
“शिवसेना हे शेठजींचं साधन नाही” -
ठाकरे यांनी शिवसेनेच्या मूळ भूमिकेची आठवण करून दिली. “शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाली होती. शेठजींची पालखी वाहण्यासाठी किंवा बूट चाटण्यासाठी नाही. काही गद्दारांनी पक्षात फूट घातली, पण मी तयार आहे – शिवसेनाप्रमुखांचा वारसा कुणालाही पुसता येणार नाही.”
सरकारवर आर्थिक धोरणांबाबत सवाल -
राज्य सरकारच्या योजनांवर टीका करत ठाकरे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही, एसटीसाठी पैसे नाहीत, पण धारावीत अदाणीला मुद्रांक शुल्क माफ केलं जातं. अदाणीला जागा फुकट, कर माफ, आणि सामान्य जनतेवर मात्र मालमत्ता कर, आता कचरा कर लादला जातो.”
"अदाणीला सर्व काही फुकट, सामान्य जनतेला भरमसाठ कर" -
ठाकरे पुढे म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवल्यावर कचरा कर थांबवण्यात आला, पण तो रद्द झालेला नाही. डम्पिंग ग्राउंड अदाणीला दिलं जातं, आणि त्याचा खर्च जनतेवर टाकला जातो. अदाणी मोकाट सुटतो, आणि सामान्य माणूस पिळला जातो. हीच खरी लढाई आहे.”