एआयच्या या युगात आयआयटी इतकेच महत्त्व आयटीआयला प्राप्त होईल - विवेक वेलणकर
जयसिंगपूर (प्रतिनिधी) - एआय व प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात येत्या काही वर्षांत आयटीआयचे महत्त्व आयआयटीच्या बरोबरीचे होईल. कारण पदवीप्रधान शिक्षणाकडे पाहण्याची मानसिकता बदलत असून, कौशल्याधारित शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले. ते दक्षिण भारत जैन सभेच्या पदवीधर संघटनेमार्फत श्रीमती सोनाबाई इंगळे सभागृह, जयसिंगपूर येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री अनिल बागणे होते. व्यासपीठावर ट्रस्टी राजेद्र झेले व दादासाहेब पाटील (चिंचवाडकर) पदवीधर संघटनेचे चेअरमन सीए भाऊसो नाईक उपस्थित होते.

विवेक वेलणकर पुढे म्हणाले, करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी केवळ गुणांकडे न पाहता स्वतःच्या क्षमतेचे आणि आवडीचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अॅप्टिट्यूड टेस्ट आणि आत्मपरीक्षण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्याला अत्यंत आवडते, मध्यम आवडते व नावडते विषय असे वर्गीकरण करून सर्वाधिक आवड असलेल्या विषयावर लक्ष केंद्रित करावे. “कोणत्या क्षेत्राला जास्त स्कोप आहे?” हा प्रश्न अनेकदा विचारला जातो; मात्र कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्या क्षेत्रात आपण स्वतः कुठे उभे आहोत, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या निकालाच्या कालावधीत घाईघाईने निर्णय न घेता शांतपणे आत्मपरीक्षण करूनच करिअरचा मार्ग निवडावा, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळा व क्लासेसचा वाटा केवळ ३० टक्के असून, उर्वरित ७० टक्के वाटा हा विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने अकरावीचा अभ्यास गांभीर्याने घ्यावा. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक व करिअरविषयक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही विवेक वेलणकर यांनी केले. यावेळी वेलणकर यांनी विद्यार्थी व पालकांच्या अनेक शंकांचे समाधान केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सभेचे मुख्य महामंत्री अनिल बागणे यांनी सांगितले की, दहावी व बारावीनंतरच्या करिअर नियोजनाबरोबरच, मुलं जन्माला आल्यानंतरच योग्य दिशादर्शन देण्याची आजच्या युगात आवश्यकता आहे. त्यांनी दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने शिक्षणावर लक्ष केंद्रित करून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यकारिणी सदस्य अशोक अथणे यांनी स्वागत व प्रस्तावना केली. जॉईंट सेक्रेटरी प्रा. माणिक घुमाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य भरतेश्वर खिचडे यांनी आभार मानले.
या कार्यशाळेला कार्यकारणी सदस्य सतीश आवटी, दादासाहेब मगदूम, प्रशांत पाटील, अनिकेत खोत, धन्यकुमार मंडपे,भरतेश जुगळे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




