कळंब्यात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट ; पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी केली घटनास्थळाची पाहणी
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर परिसरातील कळंबा रोडवरील सुर्वेनगर भागात एका बंद घरामध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने घर बंद असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे.या अचानक घडलेल्या भीषण स्फोटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, लागून असलेल्या दोन घरांच्या भिंती कोसळल्याआहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित 'डायल ११२' वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात घराचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कोणत्याही स्फोटक द्रव्याचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि तपासाचे निर्देश दिले. सुदैवाने, स्फोट झाला त्या वेळी घरामध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन कुटुंबांमध्ये असलेल्या जुन्या वादातून हा जिलेटिनचा स्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी दिली आहे. या स्फोटामुळे शेजारील दोन घरांनाही मोठा फटका बसला आहे. पोलीस प्रमुख महेंद्र नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी बारकाईने तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची तयारी सुरू आहे.
तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून ती घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे. हे घर वर्षभरापासून बंद असल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी बारकाईने तपास करत असून स्फोटामागील नेमके कारण आणि दोषींचा शोध घेतला जात आहे.




