गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी - नविद मुश्रीफ

शिरोळ (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी असे प्रतिपादन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी यावेळी केले.
चेअरमन नविद मुश्रीफ पुढे म्हणाले, “गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत उत्पादकांचे योगदान अतुलनीय आहे. संघाच्या ठेवी तब्बल ५१२ कोटींवर पोहोचल्या असून वार्षिक उलाढाल ४ हजार कोटींवर गेली आहे. ही प्रगती उत्पादकांच्या विश्वास व सहकार्यामुळेच शक्य झाली आहे.” ते पुढे म्हणाले की, “संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत. यासाठी जातिवंत म्हैस खरेदी, वासरू संगोपन, किसान विमा पॉलिसी, मिनरल मिक्चर अनुदान योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ उत्पादकांनी घ्यावा. गोकुळच्या वतीने गाभण जनावरांसाठी ‘प्रेग्नेंसी रेशन’ पशुखाद्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ‘हिप्पर रिडिंग प्रोग्रॅम’ (जातिवंत म्हैस रेडी संगोपन केंद्र) मोठ्या प्रमाणात राबवले जाणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार जातिवंत जनावरे सहज उपलब्ध होतील.”
संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. त्यात जुने मिल्को टेस्टर जमा करण्यासंदर्भात धोरण तयार करणे, सुक्या वैरणीस अनुदान वाढवणे, शिरोळ सेंटरवर ब्लड टेस्ट मशीन उपलब्ध करणे, पशुवैद्यकीय कॉल सेंटर स्थापन करणे, दूध संस्थांच्या वार्षिक घटवाढीचा अहवाल उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा समावेश होता. तसेच किसान विमा पॉलिसीचा कालावधी तीन वर्षांचा करावा अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी बबनराव चौगले (दत्तवाड), बाळासो माळी (हेरवाड), आप्पासो गावडे (शिरोळ), आप्पा पाटील (अ.लाट), जालंदर संकपाळ (घोसरवाड), उमेश पाटील (टाकळी), अजित कुपवडे (कनवाड), आदि संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालक डॉ.सुजित मिणचेकर तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मानले. संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या सत्कार श्री. धनश्री दूध संस्थेचे चेअरमन सुभाष शिरगावे यांच्या हस्ते तर उपस्थित सर्व संचालकाचा सत्कार शिरोळ तालुक्यातील विविध दूध संस्थेच्या चेअरमन व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील – चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दूध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच शिरोळ तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.