दोन मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू, कुटुंबीयांवर शोककळा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत असून, विविध कारणांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या महिन्यात मुरबाडमध्ये पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण-मुरबाड-नगर महामार्गावर आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील राजू गुप्ता आणि पवन गुप्ता हे दोघे मित्र पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. वरपगाव परिसरातील हनुमान मंदिराजवळ त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली. हा अपघात अत्यंत भीषण होता. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या या दोन्ही तरुणांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.




