परभणी-हिंगोली विधान परिषदेत बंडखोरी कायम; मेहराज खानांचा अर्ज मागे

परभणी-हिंगोली विधान परिषदेत बंडखोरी कायम; मेहराज खानांचा अर्ज मागे

मुंबई (प्रतिनिधी) : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांना बंडखोर उमेदवारांची डोकेदुखी कायम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.

या निवडणुकीसाठी शिवसेनेचे सईद खान, उबाठा शिवसेनेचे डॉ. विवेक नावंदर यांच्यासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अद्याप काही बंडखोर उमेदवार मैदानात कायम असल्याने दोन्ही प्रमुख आघाड्यांची चिंता वाढली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांच्याविरोधात काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे आघाडीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विजय जामकर, संग्राम जामकर तसेच भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असून उद्योगमंत्री उदय सामंत उद्या परभणीत बैठक घेणार आहेत. या बैठकीत नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान, डॉ. विवेक नावंदर हेही काँग्रेसचे बंडखोर सुशील देशमुख यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती मिळाली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत आणखी कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.