अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयात काय काय घडलं?
मुंबई (प्रतिनिधी) : भोंदूबाबा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला असून, न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, लगेचच एसआयटीने तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून, एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. आरोपी अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद वाचून दाखवली.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असून, त्यासाठी वेगळी चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयानेही तपास अधिकाऱ्यांना घटनेच्या कालावधीबाबत विचारणा केली असता, 2023 पासून विविध महिलांबाबत अशा घटना घडत असल्याची माहिती देण्यात आली. शेवटी न्यायालयाने आरोपी अशोक खरातला विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार देत हात जोडले. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.




