पोटच्या मुलानेच वृद्ध वडिलांसोबत केलं असं कृत्य...

पोटच्या मुलानेच वृद्ध वडिलांसोबत केलं असं कृत्य...

नागपूर - नागपूरमधील शांतिनगर परिसरातील मुदलियार चौक येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध पिता सोफ्यावर बसलेले दिसतात आणि त्यांच्या समोरच त्यांचा मुलगा, टी-शर्ट आणि बरमूडा घालून, त्यांना एकामागून एक कानशिलात मारताना दिसतो. ही केवळ हिंसा नाही, तर एका वृद्ध वडिलांच्या आत्मसन्मानावर झालेला थेट घाव आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की, हा मुलगा आपल्या आईसमोरच पित्याला वारंवार मारहाण करतो. वडील दोन्ही हात जोडून त्याला थांबवण्याची विनवणी करत आहेत, पण तो थांबत नाही. कधी त्यांच्या केसांना ओढतो, कधी कान पकडतो, तर कधी मान धरून त्यांना जबरदस्तीने झोडपतो. त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना व त्यांची असहायता प्रत्येकाचं मन हेलावणारी आहे. आईदेखील एकदा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते, मात्र ती यशस्वी होत नाही. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली आणि गोंधळलेली प्रतिक्रिया स्पष्ट दिसते. जणू तिलाही कळून चुकत की तिचा मुलगा इतका निर्दयी कसा झाला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी त्या घराचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक गजानन तामठे यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र, ज्यांना हे अत्याचार सहन करावे लागले, त्या वृद्ध वडिलांनीच पोलीसांना सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. पोलीसांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले असता, त्या वृद्ध वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 

आईने तर पोलिसांना थेट विचारलं, "हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. आम्ही काही बोललो नाही, तर तुम्ही का आलात?" पोलिसांनी आपले कर्तव्य निभावत मुलाला खडसावलं आणि भविष्यात अशी कृती केल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली.

मात्र, स्वत: च्या आईवडिलांसोबत अशी वर्तन करणारी लोकं फक्त इशाऱ्यांनीच नियंत्रणात येतील का..? ही घटना एका घरापुरती मर्यादित नाही. अनेक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलांकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास सहन करतात, पण समाज, नाते आणि प्रतिष्ठेच्या भीतीपोटी काही बोलत नाहीत.

पालकांनी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांचा सन्मान राखणे हे केवळ नैतिक कर्तव्य नाही, तर आपल्या संस्कृतीचाही मूलभूत भाग आहे. नागपूरमधील ही घटना आपल्याला समाज म्हणून आरसा दाखवते. आपण खरोखर आपल्या वृद्धांचा आदर करतो का?