बिग बॉस मराठी ६ चा नवा प्रोमो प्रदर्शित ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मुंबई - बिग बॉस मराठी सीझन ६ चा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून यंदाचा खेळ पूर्णपणे वेगळा आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रोमो पाहताच चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली असून आगामी सीझनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. “यंदाचा खेळ सगळ्यांना चकवा देणार” या टॅगलाईनसह रिलीज झालेल्या प्रोमोमुळे शोच्या संकल्पनेत मोठे बदल झाल्याचे दिसून येते. या प्रोमोमध्ये बिग बॉस केवळ टास्कपुरता मर्यादित न राहता स्पर्धकांना सतत कठीण आणि अनपेक्षित निर्णय घ्यायला भाग पाडणार असल्याचे संकेत दिले आहेत. वेगवान कट्स, गूढ संगीत आणि दमदार संवाद यामुळे यंदाचा सीझन अधिक थरारक ठरणार, असे चित्र उभे राहते.
शोचा होस्ट रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे, “यंदाचा खेळ सगळ्यांना चकवा देणार आहे. बिग बॉस मराठीचं दार उघडणार, नशिबाचा Game पालटणार! बिग बॉस मराठी ११ जानेवारीपासून रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि @jiohotstar वर.”
https://www.instagram.com/reel/DStp5yFCC9L/?utm_source=ig_web_copy_link
प्रोमोमध्ये सहाव्या सीझनच्या थीमची झलक तसेच सेटची भव्य दृश्ये पाहायला मिळतात. घराची रचना, शेकडो दार-खिडक्यांनी सजलेला जंगी सेट आणि ‘दारापल्याडचं सरप्राईज’ हे घटक प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतात, असा इशारा देतात. रितेश देशमुख एका हटके लूकमध्ये दिसत असून, “फॅन्सचा जीव जडला की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे हटत नाही,” अशा ठाम शब्दांत प्रोमोची सुरुवात होते.
यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून स्पर्धकांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे. नव्या सीझनमध्ये नेमके कोणते ट्विस्ट असणार, कोण होणार पास आणि कोण नापास, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना शो सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.




