बिग बींचा वाढदिवस ; अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या 'या' गोष्टी तुम्हांला माहित आहेत का..?
मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर असंख्य गाजलेले चित्रपट दिले असून, वयाच्या ८०व्या दशकातही ते चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींची माहिती जाणून घेऊयात. अमिताभ यांचे वडील होते प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन. सुरुवातीला वडिलांची इच्छा होती की अमिताभ यांनी चांगली नोकरी करावी. मात्र नियतीने काही वेगळंच ठरवले होते. १५ फेब्रुवारी १९६९ रोजी दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी ५,००० रुपये देऊन साइन केलं. हा चित्रपट ७ नोव्हेंबर १९६९ रोजी प्रदर्शित झाला आणि यानंतर ‘आनंद’, ‘प्यार की कहानी’ आणि ‘रेश्मा और शेरा’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केलं. मात्र, हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत.

‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ ही काही प्रमाणात यशस्वी ठरली, पण तरीही त्यांना 'फ्लॉप अभिनेता' असं म्हणायला सुरुवात झाली होती. अशा वेळी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी 'जंजीर' या चित्रपटासाठी तयारी सुरू केली. हा रोल सुरुवातीला देव आनंद, राजकुमार यांसह अनेक कलाकारांनी नाकारला होता. एके दिवशी अभिनेते प्राण यांनी प्रकाश मेहरा यांना अमिताभ याचं नाव सुचवलं आणि 'हा मुलगा भविष्यात स्टार होईल' असं ठामपणे सांगितलं. त्यांनी 'बॉम्बे टू गोवा' चित्रपट पाहण्याचा सल्लाही दिला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रकाश मेहरा म्हणाले, “मला 'जंजीर'साठी नायक सापडला आहे.”
शूटिंगदरम्यान माध्यमांमध्ये अशा चर्चा होत्या की, प्रकाश मेहरा एका फ्लॉप अभिनेत्यासोबत सिनेमा करत आहेत. त्यामुळे अमिताभ खचले आणि त्यांनी प्रकाश मेहरा यांना सांगितलं, “हा चित्रपट चालला नाही, तर मी अलाहाबादला परत जाईन.” ‘जंजीर’ साठी सुरुवातीला मुमताज नायिका असणार होती, पण त्यांनी लग्नासाठी हा प्रोजेक्ट नाकारला. अनेक अभिनेत्री अमिताभसोबत काम करण्यास तयार नव्हत्या. अखेर अमिताभ यांनी जया भादुरी यांच्याशी चर्चा केली. जया म्हणाल्या की, प्रकाश मेहरा यांनी विचारल्यास त्या नक्की चित्रपटात काम करतील. त्यांनी होकार दिला आणि चित्रपटाला गती मिळाली.
११ मे १९७३ रोजी 'जंजीर' प्रदर्शित झाला. सुरुवातीला कोलकात्यात चांगला प्रतिसाद मिळाला, पण मुंबईत अपेक्षित यश मिळालं नाही. यामुळे अमिताभ इतके निराश झाले की त्यांना ताप आला. पण काही दिवसांतच परिस्थिती बदलली. गेटी गॅलेक्सी थिएटरबाहेर तिकीटांसाठी प्रचंड गर्दी झाली होती. लोक ५ रुपयांची तिकिटं १०० रुपयांना विकत घेत होते. ही बातमी मिळताच अमिताभ यांना १०४ अंश ताप चढला होता. एक आठवड्याच्या आत अमिताभ बच्चन सुपरस्टार बनले आणि 'अँग्री यंग मॅन' म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.




