ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले असून, वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियाही झाली होती.

सतीश शाह यांनी आपल्या बहुरंगी अभिनयाने चित्रपट आणि दूरदर्शन दोन्ही क्षेत्रांत अमिट छाप सोडली. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘जाने भी दो यारो’, आणि ‘मैं हूं ना’ या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. त्यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली असून, रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
चार दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात सक्रिय राहून असंख्य लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. ‘जाने भी दो यारो’ (1983) मधील त्यांच्या भूमिकेने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कल हो ना हो’, ‘कभी हां कभी ना’, ‘ओम शांती ओम’, आणि ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.




