सांगलीत बनावट नोटा छपाई रॅकेट उघडकीस : कोल्हापूरचा पोलीस कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड
कोल्हापूर (प्रतिनिधी) - सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तब्बल 99 लाख 23 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीचा मुख्य सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी निघाला असून, त्याने चहाच्या दुकानाच्या आड बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला होता.

संपूर्ण प्रकरण कसं उघडकीस आलं?
सांगलीतील महात्मा गांधी चौकी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त कारवाई करत ही टोळी पकडली. सुरुवात झाली मिरजमध्ये, जिथे एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी आला होता. त्याच्याकडून 42,000 रूपये किंमतीच्या बनावट नोटा सापडल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तपासातून उघडकीस आलं की, कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी येथील एका चहाच्या दुकानातूनच हे बनावट नोटांचे छपाईचे काम सुरू होते.
मास्टरमाइंड – पोलीस कर्मचारी इब्रार इनामदार
या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे इब्रार इनामदार, जो कोल्हापूर पोलीस दलात मोटार परिवहन विभागात हवालदार म्हणून कार्यरत होता. तो ‘सिद्धकला चहा’ या नावाने व्यवसाय करीत होता. मात्र, या चहाच्या दुकानाच्या आड त्याने महागडी कलर झेरॉक्स मशीन, छपाईसाठी लागणारे साहित्य वापरून बनावट नोटा छापण्याचा कारभार उघडपणे सुरू केला होता.
या बनावट नोटा कोल्हापूरमधील एका अपार्टमेंटमध्ये छापल्या जात होत्या आणि त्यानंतर त्या मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वितरित केल्या जात होत्या. इब्रार आणि त्याच्या मुंबई व कोल्हापूरमधील साथीदारांनी मिळून ही योजना आखली होती. इब्रार गेल्या सात दिवसांपासून सुट्टीवर होता. पोलिसांनी या सुट्टीचा उपयोग त्याने बनावट नोटा वितरित करण्यासाठी केला का, याचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात सांगली पोलिसांनी इब्रारसह मुंबई आणि कोल्हापूरमधील चार इतर संशयितांना अटक केली आहे. सर्व संशयितांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही टोळी बनावट 500 आणि 200 रूपयांच्या नोटा छापत होती. सांगली पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून मुंबईकडे जाणाऱ्या बनावट नोटा पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकरणामुळे बनावट नोटांचं जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं असल्याचं स्पष्ट झालं आहे, त्यामुळे आता हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करणं हे महाराष्ट्र पोलिसांसमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.




