"शाहू" च्या लिक्विड फूड ग्रेड कार्बन डाय-ऑक्साइड प्रकल्पाचे राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन
कागल (प्रतिनिधी) - श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लिक्विड फूड ग्रेड कार्बन डाय - ऑक्साइड प्रकल्पाचे उद्घाटन व या प्रकल्पातून उत्पादित पहिल्या टँकरचे पूजन व वितरण शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शाहू साखर कारखान्याने कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता सहवीज ,इथेनॉल, आसवनी,बायोगॅस, बायोपोटॅश आणि इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची या आधीच यशस्वीपणे उभारणी केली आहे. या साखळीत आता या नवीन प्रकल्पाच्या उभारणीमुळे भर पडली आहे. सदर प्रकल्पातून उच्च प्रतीचा फूड ग्रेड लिक्विड कार्बन-डायऑक्साइड आणि ड्राय आईस तयार होणार आहे. सध्याच्या घडीला साखर उद्योगाला साखर निर्मिती बरोबरच उपपदार्थ निर्मितीवर भर वाढवण्याची आवश्यकता आहे. शाहू साखर कारखाना लवकरच बायो सीएनजी प्रकल्प उभारणीचे काम हाती घेणार आहे.
स्वागतपर मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, शाहू साखर कारखान्याने याआधी विविध उपपदार्थ प्रकल्पांची नियोजनबद्ध पद्धतीने उभारणी केली आहे. आता डिस्टिलरीतील प्रक्रिया करून कार्बन डाय-ऑक्साइड तयार करणारा प्रकल्प बुट बेसवर उभारला आहे. यामधील कार्बन डाय-ऑक्साइड शीतपेय, फूड इंडस्ट्रीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाचा फायदा कारखान्यास होणार आहे.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या प्रकल्पाची यशस्वीपणे उभारणी केल्याबद्दल माणिक पाटील यांचा सत्कार केला. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक,संचालिका व शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.




