मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन: शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढणारच, मुख्यमंत्र्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्वासन
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी (१७ सप्टेंबर) येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, "हे वर्षदेखील दुष्काळजन्य परिस्थितीचे ठरत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. परंतु सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ५ ऑक्टोबरनंतर तातडीने पिकांचे पंचनामे केले जातील. एनडीआरएफच्या (NDRF) मदतीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःची मदत आधीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल."
चारा-पाण्याचे पूर्वत नियोजन आणि कर्जमुक्तीचा पाठपुरावा
येत्या काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, हे विचारात घेऊन सरकारने आधीच पूर्वतयारी व योग्य नियोजन केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख करताना ते म्हणाले, "आतापर्यंत १५ लाख शेतकरी कर्जमुक्त झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे."
४८ हजार कोटींचे वीजबिल रद्द आणि ३० टीएमसी पाणी आणण्याचा संकल्प
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासोबतच त्यांची जुनी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी कटिबद्धता व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, "येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. यासाठी मराठवाड्याला अतिरिक्त ३० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाईल. कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणणाऱ्या 'नदीजोड' प्रकल्पाचा डीपीआर (DPR) अंतिम टप्प्यात असून, सात वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना रोज पिण्याचे पाणी देण्यासाठी वेगाने काम सुरू आहे."




