माझ्या पतीला अजुनही पोलिसांनी सोडलेलं नाही....सैफच्या घरी सुतारकाम करणा-याच्या पतीने मांडली व्यथा

माझ्या पतीला अजुनही पोलिसांनी सोडलेलं नाही....सैफच्या घरी सुतारकाम करणा-याच्या पतीने मांडली व्यथा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला झाला. यानंतर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. मुंबई पोलिसांची २० आणि क्राईम ब्रांचची १५ अशी एकूण ३५ पथकं सैफच्या हल्लेखोराचा शोध घेत आहेत. पण हल्ल्याला ३० तास उलटून गेल्यानंतरही आरोपी काही हाती लागलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. 

सैफ अली खानच्या घरी सुतारकाम करणाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. २४ तास उलटून गेल्यानंतरही त्यांची चौकशी सुरु आहे. वारिस अली सलमानी हे सैफच्या घरी सुतारकाम करण्यासाठी गेले होते. २४ तास उलटून गेले तरीही पोलिसांनी त्यांना सोडलेलं नाही, अशी व्यथा त्यांच्या पत्नीनं मांडली. 'माझ्या पतीनं ज्या दिवशी त्यांच्या घरी सुतारकाम सुरु केलं होतं, त्याच दिवशी हल्ल्याची बातमी आली. माझ्या पतीला  त्याच्या मॅनेजरचा फोन आला. वारिसभाई कुठे आहात, अशी विचारणा त्यानं केली आणि झालेला प्रकार सांगितला,' असा घटनाक्रम वारिस यांच्या पत्नीनं कथन केला.

ते घरखर्चासाठी ५०० रुपये देऊन गेले

'मॅनेजरनं माझ्या पतीकडे त्यांच्या कारागिरांचे फोटो, फोन नंबर मागितले. त्यावर माझे कारागीर संध्याकाळी आता येणार नाहीत, ते १० पर्यंत येतील असं उत्तर पतीनं दिलं. माझ्या पतीला पहाटे ४.३० पासून चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. २४ तासांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांची तब्येत बरी नाही. ते घरखर्चासाठी मला ५०० रुपये देऊन गेले आहेत. आता पोलीस मला त्यांच्याशी बोलूही देत नाहीत,' अशी व्यथा सलमानी यांच्या पत्नीनं मांडली.

'माझे पती सैफच्या घरी कामासाठी जाणार याची कल्पना होती. सैफ मोठे कलाकार आहेत. त्यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. त्या घटनेची चौकशी व्हावी. पण माझ्या पतीची काय चूक? त्यांची २४ तासांपासून चौकशी का केली जातेय?', असा सवाल सलमानी यांच्या पत्नीनं केला.