लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री, बांधकाम मंत्री, गृहमंत्री इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११५ वी जयंतीनिमित्त सोमवार, दि. १० मार्च २०२५ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत “महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व (१९६० ते १९८०)” या विषयावरील एकदिवसीय परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादामध्ये मान्यवर अभ्यासक मार्गदशन करणार आहेत.
त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राजकीय नेतृत्व, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. श्रीराम पवार हे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाचे अंतरंग, ज्येष्ठ राजकीय विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर हे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाचा आढावा (१९६०-१९८०), तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. अरुण भोसले हे महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व (१९६०-१९८०) या विषयावर मांडणी करणार आहेत.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के भूषविणार आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत. तरी सर्व कोल्हापूरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी केले आहे.