वाहनचालकांनो सावधान..फास्टॅग,युपीआय नसेल तर वाहन पुढे नेता येणार नाही
मुंबई (प्रतिनिधी) : देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १० एप्रिल २०२६ पासून टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, आता टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद केली जाणार असून डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.

उद्यापासून टोल नाक्यांवरील 'कॅश लेन' पूर्णपणे बंद केल्या जातील. जर एखाद्या वाहनधारकाकडे वैध फास्टॅग नसेल किंवा डिजिटल पेमेंटची सोय नसेल, तर त्याला टोल प्लाझावरून पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. नवीन नियमांनुसार, अनेक महामार्गांवर 'ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम' लागू केली जात आहे. यामुळे वाहन जेवढे अंतर कापेल, तेवढाच टोल कापला जाईल. टोल प्लाझावर थांबण्याची गरज आता उरणार नाही.
जर एखाद्याने नियमांचे उल्लंघन करून टोल नाक्यावर गोंधळ घातला किंवा रोख रकमेचा आग्रह धरला, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. तसेच, अशा वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकारही प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करा. जर तुमच्या वाहनावर अजूनही फास्टॅग नसेल, तर तो आजच लावून घ्या, अन्यथा उद्यापासून तुम्हाला प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.




