'शाहू' च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात संकेत पाटील तर महिला गटात सृष्टी भोसले प्रथम क्रमांकाचे मानकरी

'शाहू' च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात संकेत पाटील तर महिला गटात सृष्टी भोसले प्रथम क्रमांकाचे मानकरी

कागल (प्रतिनिधी) - कागल येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत घेतलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात पाचगांवच्या संकेत पाटीलने एकोंडीच्या विवेक चौगुलेवर तर महिला गटात पिराचीवाडी येथील 'शाहू'ची मानधनधारक सृष्टी भोसलेने गोकुळ शिरगाव येथील 'शाहू'ची मानधनधारक सुकन्या मिठारीवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. 

त्यांना कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,राजे बँकेचे संचालक एम.पी.पाटील आदींच्या हस्ते बक्षीस वितरण केले.यावेळी कारखान्याचे आजी - माजी संचालक, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरुष गटात पवन बराळे (कळंबा) व अतुल मगदूम (इस्पुर्ली) यांनी तर महिला गटात दिया हजारे (यळगुड) हिने तिसरा क्रमांक पटकाविला.स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख रक्कम, पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी या स्पर्धा सुरू केल्या. त्यांच्या पश्चात शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनातून या स्पर्धा सलग ३९व्या वर्षी संपन्न होत आहेत.महिला व पुरुष यांच्या विविध ३८ गटांमध्ये या स्पर्धा झाल्या.या स्पर्धेत उच्चांकी ४५८ मल्लांनी भाग घेतला.चार दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उदघाटन शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

 स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम लढतींचा थरार अनुभवण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविल्यामुळे कुस्त्या सुरू असलेले गोडाऊन खचाखच भरले होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धा संपूर्णपणे ऑलिंपिकच्या धर्तीवर झाल्या. स्पर्धेच्या नेटक्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कुस्ती शौकीनांनी कौतुक केले. कुस्ती शौकिनांना घरबसल्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी महाखेल स्पोर्टस या यूट्यूब चैनलवरून स्पर्धेचे केलेले थेट प्रसारण भारतासह अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली,कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी वीस देशातील एक लाख चोप्पन्न हजारहून अधिक कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने पाहून कुस्तीचा थरार अनुभवला.

'शाहू'च्या अनोख्या सन्मानाने भारावल्या माता-भगिनी....!

या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी महिला मल्लांचा उत्सफुर्त सहभाग होता.विशेष म्हणजे त्यांच्यासह सर्वच मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला कुस्ती शौकिनांचीही लक्षणीय उपस्थिती होती. संयोजकांनी या उपस्थित महिलांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ करून त्यांच्याच शुभहस्ते बक्षीस वितरणही केले.'शाहू' च्या या अनोख्या सन्मानामुळे या माता -भगिनी भारावून गेल्या.