26 एप्रिलची शिष्यवृत्ती परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, मात्र सध्या राज्यामध्ये उन्हाचा प्रखर तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये पुरेशी पंख्यांची तसेच थंड पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्यावर उष्णतेचा किंवा उष्माघाताचा विपरीत परिणाम होऊन त्यांची एकाग्रता व मानसिक स्थिती ढासळण्याची शक्यता आहे.

परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो म्हणून सदर परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी मात्र परीक्षेचे वेळापत्रक सकाळच्या वेळेत ठेवण्यात यावे याबाबतचे निवेदन प्रमोद तोंडकर जिल्हा अध्यक्ष, प्रभाकर कमळकर जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्यावतीने व्हाट्सअप व ईमेलद्वारे डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व महेश चौथे आयुक्त परीक्षा परिषद यांना पाठविण्यात आले आहे.




