कोल्हापुरातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी गाळ उपसा करण्याची मागणी

कोल्हापुरातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी गाळ उपसा करण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या वतीने जिल्ह्यातील नद्या व नदीकाठच्या भागात दरवर्षी निर्माण होणाऱ्या भीषण पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व पूरबाधित शहरे व गावांतील नागरिकांच्या वतीने श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा, दुधगंगा व वारणा या प्रमुख नद्यांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. या पुरामुळे पिके, जनावरे, घरे व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जलप्रदूषणासारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जात असून ग्रामस्थ व शहरातील नागरिकांच्या घरांचे व जनावरांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच या पूराचा पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असून शासनावर नुकसानभरपाईचा आर्थिक भार वाढत आहे.

शासनाकडून प्राप्त माहितीनुसार सन २०१४ पासून नद्यांतील गाळ उपसा झालेला नाही. त्यामुळे नदीची पात्रे अरुंद होत चालली असून नद्यांची खोलीही कमी झाली आहे. नद्यांमध्ये साचलेला गाळ हा पूरपरिस्थिती वाढण्याचे एक प्रमुख कारण असल्याने गाळ उपसा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गाळ उपसा केल्यास नदीची जलवाहन क्षमता वाढून सध्या ४० ते ४७ फूटांपर्यंत जाणारी पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. गाळामुळे अडथळा निर्माण झालेला पाण्याचा प्रवाह मोकळा होऊन नदीतील पाणी वेगाने बाहेर पडेल व पूरपरिस्थिती कमी होईल. यासाठी योग्य यांत्रिकी साधनांचा वापर करून, पर्यावरणाचा समतोल राखत गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी श्री छत्रपती शाहु महाराज सोशल फौंडेशनचे अध्यक्ष संजय पोवार (वाईकर),  तात्यासो पाटील, भिमराव पवार, विद्यानंद जिरगे, बाळासाहेब पवार, शिवाजी पाटील, अमर समर्थ, सचिन चौगुले, उदय फाळके, डॉ. संजय पाटील,पांडूरंग सावंत, मारूती पाटील, अशोक माने, उदय कदम, विश्वास आयरेकर, विक्रमसिंह घाटगे, दिलीप पाटोळे, प्रदिप मेठे पवार, विक्रांत बनसोडे, हरी माळवी, अजिंक्य संकपाळ, देविदास कदम, डॉ. चैतन्य चंदनशिके, महेश फडतरे, संदीप पाटील, सत्यजित शेजवळ, मिनाताई शेजवळ, आयान अत्तार, गणेश डेवाडिम, तानाजी पाटील, विश्वजीत पटकारे, प्रियांका पाटील, अनिल साळुंखे, नागेश पाटील, विजय सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते.