ग्रंथ हे ज्ञान, संस्कार आणि विचारप्रक्रियेचे शास्त्रोक्त माध्यम : अनिल बागणे
यड्राव (प्रतिनिधी) : "ग्रंथ हे केवळ माहितीचे भांडार नसून ज्ञान, संस्कार आणि विचारप्रक्रियेचे शास्त्रोक्त माध्यम आहे. वाचन ही मानवी बुद्धीच्या विकासाची मूलभूत प्रक्रिया असून तीच विश्लेषणात्मक विचार, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता विकसित करते." असे प्रतिपादन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधील पुस्तक प्रदर्शन उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. बाहुबली संगमे, बी.ए.एम.एस.चे प्राचार्य डॉ. प्रमोद कनप, फार्मसीचे प्राचार्य गौरी फडके, प्रमुख उपस्थीत होते.

यावेळी बागणे पुढे म्हणाले, अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच अवांतर वाचन करणे अत्यावश्यक आहे. कारण बहुआयामी ज्ञानामुळेच सक्षम, जबाबदार आणि नवोन्मेषी अभियंते घडतात. त्यामुळे अशा पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा व्यापक दृष्टीकोन मिळेल.
यावेळी ग्रंथपाल युवराज पाटील म्हणाले, पुस्तक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबर अवांतर वाचन साहित्याचा खजिना उपलब्ध झाला आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. सर्वांना सवलतीच्या दरात पुस्तके मिळणार आहेत. तरी प्रदर्शन बुधुवारी ही सर्वांसाठी खुले आहे. वाचकांनी याचा लाभ घ्यावा.
प्रदर्शनास शाळकरी विद्यार्थ्यांपासून जेष्ठांपर्यंत हजारो विद्यार्थी व रसिकांची भेट सुरू आहे. भेटीबरोबरच पुस्तकांच्या खरेदीचा ओघ कायम आहे. गेली अनेकवर्षे होत असलेल्या या प्रदर्शनाला वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी, कथा, कादंबरी, चरित्रे, वाडःमय, स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., अभियांत्रिकी, तांत्रिक यासह विविध विषयावरील हजारो पुस्तकांचा समावेश आहे. प्रदर्शनात बेस्ट बुक सेलर्स व मेहता बुक सेलर, कोल्हापूर यांचा समावेश आहे.यावेळी बेस्ट बुकचे सुहास माने, मेहता बुक सेलरचे वाहिद मणेर यांच्यासह परिक्षा नियंत्रक, सर्व डिन, विभागप्रमुख, सर्व ग्रंथालयाचे ग्रंथपाल, प्राध्यापक उपस्थीत होते. पुस्तक प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सौ. किशोरी गरड, राजेंद्र तेली, अजित पोवार यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




