जिल्हा परिषद सोसायटीस साडेतीन कोटींचा नफा
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला सन २०२५ / २६ या आर्थिक वर्षात संस्था स्थापनेपासूनच पहिल्यांदाच ३ कोटी ६० रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष नंदीप मोरे आणि उपाध्यक्ष जयकुमार रेळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. संस्थेची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १४ जून रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या महालक्ष्मी हॉलमध्ये होणार आहे.

संस्थेतर्फे सभासदांसाठी सन २०२५ ने / २६ सालासाठी १२.५० टक्के दराने १ कोटी ३३ लाख रुपये लाभांश देण्यात येणार आहे. कायम ठेवीवर सव्वानऊ टक्के दराने ३ कोटी ११ लाख रुपयांचे व्याज, वर्गणी ठेवीवर सव्वाआठ टक्के दराने १ कोटी ६६ लाख रुपये व्याज आणि व्याज रिबेट ०.५० टक्के दराने ८६ लाख रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर या रकमा सभासदांना अदा करण्यात येणार आहेत. तसेच सभेत सेवानिवृत्त सभासदांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
कोअर बँकिंग सुविधा, मोबाइल अॅप, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय, लॉकर, ३५ लाख रुपयांची कर्जमर्यादा यासह सभासदांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या लाभासाठी अनेक योजना संस्थेने राबविल्या आहेत.




