महादेवीला परत आणण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर नांदणीचे भट्टारक जिनसेन महाराज म्हणाले...

महादेवीला परत आणण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर  नांदणीचे भट्टारक जिनसेन महाराज म्हणाले...

मुंबई - मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नांदणी मठातील 'महादेवी' हत्तीणीला परत आणण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली. या बैठकीत महादेवीसाठी राज्य सरकार मध्यस्थी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीनंतर नांदणी मठाचे भट्टारक जिनसेन महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे. महादेवी हत्तीणीच्या बाबतीत आम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया वकिलांशी चर्चा करून ठरवली जाईल, आणि लवकरच पुन्हा बैठक घेण्यात येईल.”

राज्य सरकार आणि नांदणी मठ दोघेही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. महादेवीला पुन्हा मठात आणण्याचा सरकारचा ठाम निर्धार असून, तिच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. रेस्क्यू सेंटर व आहार व्यवस्थेच्या बाबतीतही सरकार कोर्टाला योग्य माहिती देऊन खात्री देणार असल्याचंही भट्टारक जिनसेन महाराज म्हणाले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक, वरूर मठाचे धर्मसेन भट्टारक, माजी खा. राजू शेट्टी, आ. सतेज पाटील,खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.