माधुरी हत्तीणीप्रश्नी कोल्हापूरकरांची वज्रमुठ ठरली भारी - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नांदणी मठाच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणी प्रश्नी कोल्हापूरकरांची वज्रमूठ भारी ठरली आहे. या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धर्मीयांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या आहेत.
मंत्री मुश्रीफ यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, आज सकाळीच वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नांदणी तास शिरोळ येथील मठामध्ये जाऊन मटाचे महास्वामीजी आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्या चर्चेत महादेवी हत्तीण लवकरच कोल्हापुरात परतणार आणि त्या ठिकाणीच वन ताराचे एक नवीन केंद्र तयार करण्याचे आश्वासन या पथकाने दिली आहे.
याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेचे अभिनंदन आणि धन्यवाद. ही लढाई कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वधर्मीय जनतेने वज्रमुठ तयार करून एकजुटीने लढली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा जर स्वाभिमानाने पेटून उठला तर काय घडू शकते, याचीच ही प्रचिती आहे.
दरम्यान वन ताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की, महादेवी हत्तीणीचे पुनर्वसन केंद्र नांदणी मठातच करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागतच. दरम्यान; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्याबद्दल जो रोष आणि कटुता तयार झाली होती ती नाहीशी व्हायची असेल तर आळते येथील जंगल घेऊन वनतारा फेज - दोन करावे. यामुळे कोल्हापूर जिल्हा वासियांच्या मनातील त्यांच्याबद्दलचा रोष आणि कटूता कमी होईल. यासाठी आवश्यक आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करू असही ते म्हणाले.
या सर्व यशस्वी प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनताराचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तमाम कोल्हापूर जिल्हावासीयांचे मनःपूर्वक आभार......!