विराट कोहलीची झेप ; ICC च्या ODI क्रमवारीत भारताचे वर्चस्व
Cricket News - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत - दक्षिण आफ्रिका ODI मालिकेदरम्यान ताज्या वनडे क्रमवारीची घोषणा केली असून, या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मोठ्या उड्डाणासह पुन्हा अव्वल स्थानाच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. रांचीतील पहिल्या सामन्यात कोहलीने खेचलेल्या १२० चेंडूत १३५ धावांच्या भक्कम शतकामुळे त्याच्या रेटिंग गुणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नव्या क्रमवारीनुसार तो चौथ्या स्थानी पोहोचला असून त्याचे गुण ७५१ झाले आहेत. अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्मापेक्षा तो आता फक्त ३२ गुणांनी मागे आहे. रोहित आणि विराट यांच्या दरम्यान न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (दुसरा) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान (तिसरा) अशी दोनच नावे आहेत.

कोहलीने मागील दशकाच्या अखेरीस सलग तीन वर्षांपेक्षा जास्त काळ वनडे क्रमवारीत नंबर १ चे स्थान राखले होते; मात्र एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकले होते. आता तो पुन्हा शिखराच्या अतिशय जवळ पोहोचला आहे. टॉप-१० यादीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलही आहे. मात्र, त्याला एका स्थानाचे नुकसान होऊन तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. सहाव्या ते दहाव्या क्रमांकातील फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र कोणताही बदल झाला नाही.
भारतीय गोलंदाज कुलदीप यादव यानेही एक स्थानाची झेप घेत ODI गोलंदाजांच्या यादीत सहावे स्थान मिळवले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीमुळे न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला एक स्थान गमवावे लागले असून तो सातव्या स्थानी गेला आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान अव्वल क्रमांकावर कायम आहे, तर इंग्लंडचा जोफ्रा आर्चर दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज तिसऱ्या स्थानी आहे.




