आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये

आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये

 कोल्हापूर( प्रतिनिधी) आकृतीबंधातील कार्यरत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्राप्त होणारे वेतन अनुदान सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते, त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत होते, या प्रक्रियेमुळे वेतन जमा होण्यासाठी विलंब लागत होता.

  वेळेवर उपलब्ध होत नसलेल्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत होता, त्यामुळे संबंधित कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी वेतन थेट जिल्हास्तरावरूनच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत आदेश दिले असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर सदरची रक्कम जमा करण्याचे निश्चित केले असून यापुढे देखील शासन स्तरावरून प्राप्त होणारे वेतन थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास मान्यता दिली आहे .

    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आभार मानून, समाधान व्यक्त करण्यात आले.