आदमापुर बाळूमामा भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक; चंद्र सूर्याची टक्कर होईल; राजकीय गोंधळ निर्माण होईल

Balumama Bhaknuk 2025 : आदमापुरात दरवर्षी संत बाळूमामाच्या वार्षिक भंडारा उत्सवात भाकणूक केली जाते. या वर्षी बाळूमामाच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांनी केलेली भाकणूक (भविष्य कथन) चंद्र-सूर्य टक्कर, तीन दिवस अंधार आणि समान नागरी कायदा यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते.
पृथ्वीचा करार संपत आला आहे. सूर्य, चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. चंद्र सूर्याची टक्कर होईल, तीन दिवस जगात अंधार राहील. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्यांना मारणार, कळपातला शोधून काढणार. शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार, बाळूमामाचे आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियातून लोक येतील, अशी भविष्यवाणी कृष्णात बाबुराव डोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली. या मराठी वर्षातील ही शेवटची अन् महत्वाची भाकणूक आहे.
आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा भंडारा यात्रा प्रसंगी महाप्रसाद दिनी मंदिरा समोर भाकणूक पार पडली. बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्यासह हजारो भक्तगण उपस्थित होता.
कृष्णात डोणे पुढे म्हणाले की, भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया - चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. भारत देश हिंदूराष्ट्र होईल.
राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. महामारी, भूकंप, उष्णता आणि जलप्रलयासारख्या नैसर्गिक आपत्त्या येण्याची शक्यता आहे. नदी जोड प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल आणि टोळी युद्ध होतील, अशी भविष्यवाणी भगवान डोणे महाराजांनी केली आहे.