“उद्धव ठाकरे पुन्हा आमदार?” विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?

“उद्धव ठाकरे पुन्हा आमदार?” विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीयांचं घोडं उमेदवाराबाबत अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जावं, असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला मविआ नेत्यांकडून आग्रह केला जात आहे. मात्र अर्ज भरायला 1 दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून आहे. 

काँग्रेसचे नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षांच्या नेत्यांचाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह धरला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडूनसुद्धा उद्धव ठाकरे यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार? की महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसांपर्यंत कायम ठेवणार हे पहावं लागेल. 

उद्धव ठाकरे 2020 मध्ये विधान परिषद सदस्य झाले. उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. ते रिंगणात राहिले तर निवडणूक बिनविरोध करण्याकडे भाजपचाही कल असेल. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.