उद्योगांसोबतच आता निसर्गाचेही संवर्धन! शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि गार्डन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन, हरित औद्योगिक परिसर निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी हिरवागार वारसा जपण्याचा संदेश देत शिरोली औद्योगिक क्षेत्रात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक), गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या या अनोख्या उपक्रमात डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, प्रिन्स शिवाजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कलाप्रबोधिनी कॉलेज आणि डी. सी. नरके स्कूलचे विद्यार्थी-शिक्षकांसह सुमारे १५० पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके आणि शिल्पा नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
या अभियानांतर्गत पिंपळ, वड, करंज, पारिजातक, बकुळ, अर्जुन आणि कडुनिंब यांसारख्या १२५ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेसाठी शिल्पा नरके यांनी प्रमुख आर्थिक सहाय्य केले, तर कीर्तीकुमार शेंडगे, वर्षा वायचळ, रजनी जाधव आणि पारितोष उरकुडे यांनी रोपे व खतांचे सहकार्य केले. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात 'ग्रीन क्रेडिट' उपक्रमाची माहिती देत औद्योगिक परिसरात योग्य पद्धतीने वृक्ष लागवड व संगोपन करण्याविषयी मार्गदर्शन केले. चारुता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपण न करता या झाडांना जगवण्यासाठी ठिबक सिंचन, मल्चिंग आणि सेंद्रिय खतांच्या माध्यमातून नियमित देखभाल करण्याचे ठोस नियोजन स्मॅक आणि गार्डन्स क्लबने केले आहे. 'वन महोत्सव २०२६ - हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियानाचाच हा पुढचा टप्पा असून यापूर्वी स्मॅकने उद्योगांमध्ये ५०० वृक्षांचे वाटप केले होते. कार्यक्रमाला एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, स्मॅकचे संचालक राजू पाटील, अतुल पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी "जय वसुंधरा" असा घोष करत पर्यावरण संरक्षणाचा दृढ निर्धार व्यक्त केला.




