उमेदवारी, नाराजी आणि जय पवार कर्जप्रकरणावर विक्रम काकडे स्पष्टपणे बोलले
पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे देखील पुणे विधान परिषदेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र सुनील टिंगरेंना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील बोलावून दाखवली. दरम्यान, कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्याने विक्रम काकडे यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बैठका आणि चर्चांनंतर सुनील टिंगरेंनी माघार घेतली, या सर्व घडामोडींबाबत आता विक्रम काकडे यांनी भाष्य केलं आहे.

विक्रम काकडेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अनेक जण इच्छुक होते. एकदा उमेदवार जाहीर झाला की, पक्षांतर्गत नाराजी दूर होते. मी सगळ्यांची कालपासून भेट घेत आहे. जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो. काल सुनील टिंगरे यांना देखील भेटलो. निवडणूक लागली तर रणनिती कशी असावी याची चर्चा करावी. महाविकास आघाडीने जर माघार नाही घेतली तरी आम्ही तयारी केली आहे. आमच्याकडे मताधिक्य जास्त आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के मतदार आमच्याकडे आहेत. सगळी मतं मलाच मिळतील. महायुती म्हणून सोबत आहोत. प्रदीप कंद माघार घेतील असा विश्वास आहे. महायुतीची मतं विभागणार नाहीत, असा विश्वास देखील विक्रम काकडेंनी व्यक्त केला आहे.
विक्रम काकडेंनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे या चर्चांवरती बोलताना विक्रम काकडे म्हणाले की, मी जिथे राहतो त्याच्या बाजूचा प्लॉट जय पवार यांच्या नावावरती आहे, ती जागा मला हवी होती म्हणून ॲडव्हान्स लोन दिलेलं होतं, असंही काकडेंनी सांगितलं आहे.




