'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घ्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे

'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घ्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घ्या, त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

कोल्हापुरकरांचा मानबिंदू असलेल्या व पुरोगामी विचारांच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित शाहू जयंती पंधरवड्यात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून  5 जुलै रोजी एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 300 गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतक-यांसोबत व्यतीत करुन शेतक-यांच्या अडचणी समजून घ्यावयाच्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. शिवार फेरी, शेती शाळा, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन आदी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या व अडी-अडचणी, प्रश्न समजून घ्या. याबरोबरच त्या त्या गावांतील समस्या, त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रशासकीय निर्णय घेणे आवश्यक असणाऱ्या बाबी अभिप्राय नोंदवहीत नोंदवा. या कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी दिले. 

तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, इतर जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी यांच्या समन्वयातून व चोख नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवा. संबंधित प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सकारात्मक पद्धतीने सहभागी होऊन पीएम किसान, ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान अशा महत्त्वपूर्ण योजनांबरोबरच विविध विभागांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, शेतकऱ्यांशी निगडित विषय, विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक दिवस बळीराजा हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजनातून हा उपक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी करावा. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या नोंदी सविस्तरपणे करा, जेणेकरुन शेतकऱ्यांच्या व त्या त्या गावांच्या अडचणींची माहिती जमा होऊन त्याचे निराकरण करणे सोयीचे होईल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी हा उपक्रम राबविण्याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. 

यावेळी उपसंचालक नामदेव परीट, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्यासह आदी उपस्थित होते.