ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची मागणी; सुधीर मुनगंटीवारांचे सरकारला पत्र
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित एक महत्त्वाची मागणी समोर आली आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीC विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना पत्र पाठवून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. मात्र, सुरक्षित आणि परवडणाऱ्या निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात, तर काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते, असे मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या शासकीय वसतिगृहांची क्षमता अनेक ठिकाणी अपुरी पडत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने पुढाकार घेतला असून, १४ जुलै रोजी राज्यभर 'विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह' आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यव्यापी धोरणात्मक निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहांची उभारणी करावी, अशी आग्रही मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.




