कोल्हापूर पोलिस दल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा पोलिस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन लिपीक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर अलंकार हॉल, पोलिस मुख्यालय, कोल्हापूर येथे पार पडले.
या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी उपस्थित होते.
या उपक्रमामागील उद्दिष्ट पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांचे आरोग्य सुदृढ राखणे हे होते. पोलिसांना त्यांच्या २४ तासांच्या ड्युटीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिसांसाठी आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. कुलकर्णी यांनी डॉक्टर व पोलिस हे दोघेही सतत सेवा देणारे असून त्यांना वेळेचे बंधन नसते, हे नमूद करत नियमित व्यायाम, संतुलित आहार व वेळेवर तपासणी यामुळे ताण - तणाव कमी करता येतो, असे सांगितले.
या शिबिरात हृदयरोग, जनरल सर्जरी, त्वचारोग, अस्थिरोग, यूरोलॉजी, दंतचिकित्सा, पॅथॉलॉजी अशा विविध वैद्यकीय तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ३९९ पोलिस अधिकारी, कर्मचारी, लिपीक व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत इतर शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांनाही अशा तपासणी शिबिरांचा लाभ मिळावा यासाठी व्यापक आरोग्य कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या. तसेच हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमावेळी निकेश खाटमोडे-पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक), सुवर्णा पत्की (पो. उप अधीक्षक), रविंद्र कळमकर, सुरजितसिंह राजपूत, राजकुमार माने, हणमंत काकंडकी यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.