डीकेटीईमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट – विद्यार्थ्यांशी व उद्योजकांशी सुसंवाद

डीकेटीईमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट – विद्यार्थ्यांशी व उद्योजकांशी सुसंवाद

इचलकरंजी -  इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे ‘आन, बान आणि शान आहे असे गौरवोदगार देशाचे वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी डीकेटीईमध्ये काढले. डीकेटीईसारख्या संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर भारताचा लौकीक वाढवत आहेत असेही ते म्हणाले. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजींच्या संकल्पनेतून वस्त्रोद्योग उत्पादन एक्सपोर्ट करण्यावर उदयोजकांनी भर दयावा असे आवाहन त्यांनी उपस्थित युवाउदयोजकांना केले. यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इन्स्टिटयूटमध्ये त्यांचे स्वागत केले.

भेटीदरम्यान मान्यवरांनी संस्थेच्या विविध विभागांना भेट देवून सुरु असलेल्या शैक्षणिक व संशोधन कार्याचा आढावा घेतला. त्यांनी तृतीय व अंतिम वर्ष बी.टेक टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट संशोधनाचे अभिनंदन केले. नवकल्पना आणि सृजनशिलतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन केले. संस्थेच्या आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत प्रयोगशाळा आणि डीकेटीईमध्ये दिल्या जाणा-या शिक्षण व संशोधनाची गुणवत्ता निश्‍चितच वाखाणण्यासारखी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आवाडे दादांचे आशिर्वाद घेत त्यांच्या शिक्षण व उद्योग क्षेत्रातील योगदानाचा सन्मान केला. याप्रसंगी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील समन्वय वाढविण्यासाठी विविध चर्चा झाल्या.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी संस्थेचा इतिहास सांगत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले डीकेटीईचे अनेक माजी विद्यार्थी जगभरात आपली छाप पाडत आहेत. विशेषत: इचलकरंजीमधील माजी विद्यार्थी संजय कुरकुटे यांनी आंतरराष्ट्रीय १६ पेटंट मिळवले आहेत असा त्यांनी उल्लेख केला. मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा उहापोह करीत प्रकाश आण्णांनी वस्त्रो उद्योजकांच्या पुढाकाराने इचलकरंजीला शटललेस नगरीबरोबरच देशातील नंबर एकची एक्स्पोर्ट नगरी बनविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त केला, त्यासाठी सरकार कडून वस्त्रोद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य मिळावे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहूल आवाडे, आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, ट्रस्टी सुनिल पाटील, डॉ. ए.बी. सौंदत्तीकर, एस. डी. पाटील, अनिल कुडचे, स्वानंद कुलकर्णी, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे, वैशाली आवाडे, मोसमी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे. पाटील यांचेबरोबरच वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.