डीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

इचलकरंजी (प्रतिनिधी) - डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘मी राजवाडा बोलतोय‘ या आगळया वेगळया ओपन हाऊस सेशन ऍट कॅम्पस या कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमाला प्रथम वर्ष इंजिनिअरींगला ऍडमिशन देवू इच्छुक १४०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून संस्थेच्या नाविण्यपूर्ण कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कार्यक्रमाची सुरवात माजी विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. अडमुठे यांनी स्वागत करत विद्यार्थ्यांसाठी योग्य करिअर निवडीसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी सीईटी प्रवेश प्रक्रियेतील बदल, कॅप राउंडची कार्यपध्दती व यामध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. मागील वर्षीच्या व यंदाया कॅप राउंडमधील बदलांची माहितीही यावेळी त्यांनी स्पष्टपणे मांडली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सार डॉ. अश्विनी रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतातून मांडले.
डीकेटीईवरील माहितीपटाद्वारे उपस्थितांना संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रयोगशाळा, स्टार्टअपस व संशोधन याची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचा सर्वांत प्रेरणादायी टप्पा म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाने रंगला. डीकेटीईमध्ये शिकलेले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी सांगितले की, डीकेटीई हे केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर ती एक कुटुंब आहे जिथे शिक्षक मार्गदर्शक असतात, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास हा संस्थेचा ध्यास असतो. येथील शिस्तबध्द आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून मिळणा-या नोक-या याचा उल्लेख केला. त्यांच्या अनुभवाने उपस्थित पालक व विद्यार्थ्यांमध्ये डीकेटीईबददल नवे आत्मविश्वासाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
अथर्व जमखंडीकर, अनिकेत बारवाडे, गौरव मर्दा, हर्षल बिडकर, प्रांजली देशमुख या डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर अनिल मगदुम, अरविंद चव्हाण व मनिषा कुलकर्णी यांनी पालक म्हणून संस्थेशी असलेले नाते स्पष्ट केले. यानंतर सर्वजणांची गटवार विभागणी करुन सर्वांना महाविद्यालय दाखविण्यात आले. तेथेही विद्यार्थी व शिक्षकांशी सर्वांचा मुक्त संवाद झाला. कार्यक्रमाच्या आयोजनाबददल विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह डायरेक्टर, डे. डायरेक्टर सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी प्रभावी सुत्रसंचालन केले.