तंबाखू सेवन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या- कर्करोग तज्ञ डॉ.अक्षय शिवछंद
कोल्हापूर (प्रतिनिधी): तंबाखूमुक्त समाजाकडे वाटचाल,जागरूकता, प्रतिबंध आणि उपचार ही काळाची गरज आहे.दरवर्षी ३१ मे रोजी संपूर्ण जगभर "जागतिक तंबाखू निषेध दिन" पाळला जातो. या दिवसाचा उद्देश केवळ तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगणे नसून, समाजामध्ये तंबाखूमुक्त जीवन - शैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे आणि तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करणे हा आहे. भारतासारख्या देशात तंबाखू सेवन ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. अशी प्रतिक्रिया क्युरालाईफ कॅन्सर सेंटरचे कर्करोग तज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांनी ३१ मे या "जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त दिली.

या वेळी डॉ.शिवछंद म्हणाले आज भारतामध्ये लाखो लोक गुटखा, मावा, पानमसाला, बीडी, सिगारेट, हुक्का आणि इतर विविध प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढणारे व्यसन चिंताजनक आहे. "फक्त एकदाच", "मित्रांसोबत मजा म्हणून" किंवा "ताण कमी करण्यासाठी" सुरू झालेले सेवन अनेकदा कायमचे व्यसन बनते आणि पुढे जाऊन कर्करोगा सारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण देते.
वैद्यकीय संशोधनानुसार तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग,स्वरयंत्राचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग तसेच हृदयविकार, स्ट्रोक, COPD आणि इतर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. भारतामध्ये विशेषतः मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अत्यंत जास्त असून त्यामागे गुटखा व तंबाखू सेवन हे प्रमुख कारण आहे. दुर्दैवाने अनेक रुग्ण उशिरा निदानासाठी येतात, जेव्हा आजार बिकट अवस्थेत पोहचलेला असतो.
तंबाखूचे दुष्परिणाम केवळ सेवन करणाऱ्या व्यक्तीपुरते मर्यादित नसतात. घरातील कुटुंबीय, विशेषतः लहान मुले व महिलांनाही "Passive Smoking" मुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे.
आजच्या काळात कर्करोगाविषयी भीतीपेक्षा जागरूकता अधिक महत्त्वाची आहे. प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास अनेक प्रकारचे कर्करोग पूर्णपणे बरे होऊ शकतात. म्हणूनच नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.
तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींनी तोंडामध्ये न भरणारे व्रण, पांढरे किंवा लाल चट्टे, गिळताना त्रास, आवाज बसणे, सतत खोकला किंवा वजन घटणे यांसारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.
आज अत्याधुनिक वैद्यकीय क्षेत्रामुळे कर्करोग उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि प्रिसिजन मेडिसिन यांसारखे आधुनिक उपचार अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. मात्र, कोणताही उपचार करण्यापेक्षा कर्करोग टाळणे अधिक महत्त्वाचे आहे, पण सर्वात प्रभावी उपचार अजूनही तोच आहे- तंबाखूला सुरुवातीलाच नकार देणे.
एका कुटुंबाचा विचार केला तर तंबाखू केवळ आरोग्यच नष्ट करत नाही, तर आर्थिक कणा देखील मोडतो. घरातील कमावती व्यक्ती कर्करोगाने आजारी पडल्यावर उत्पन्न थांबते, उपचार खर्च, मानसिक ताण वाढतो आणि संपूर्ण कुटुंब संकटात सापडते. तंबाखू हा केवळ वैयक्तिक व्यसनाचा विषय नाही; तो सामाजिक दारिद्र्याशी जोडलेला मुद्दा आहे. तंबाखू सोडणे कठीण असले तरी अशक्य नाही. इच्छाशक्ती, कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य वैद्यकीय समुपदेशन यांच्या मदतीने अनेक लोक यशस्वीरित्या व्यसनमुक्त झाले आहेत.
सुरुवातीपासूनच "Cure Care Compassion या तत्वावर कार्य करत " असून, ग्रामीण आणि निमशहरी CuraLife Cancer Centre भागातील रुग्णांना परवडणारी आणि आधुनिक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. कर्करोगाविषयी मीती कमी करून जनजागृती वाढवणे, लवकर निदानाला प्रोत्साहन देणे आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर मार्फत विविध कर्करोग जनजागृती उपक्रम आरोग्य शिबिरे, तंबाखूविरोधी मोहिमा आणि समाजप्रबोधन कार्यक्रम राबवले जात आहेत.
विशेषतः युवकांमध्ये व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये व्याख्याने व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते.
"Cancer Free Kolhapur" या व्यापक संकल्पने-अंतर्गत प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यावर विशेष भर दिला जात आहे.
आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी शासन, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे गरजेचे आहे. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचे अनेक जीव वाचवू शकतो.
जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून एक संदेश द्यायला भविष्यासाठी पुढाकार घेऊया." हवा. "तंबाखू सेवन टाळूया.. आरोग्यदायी आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी पुढाकार घेऊया.
कॅन्सरमुक्त कोल्हापूर या ध्येयासाठी क्युरालाईफ कॅन्सर सेंटर कटिबद्ध असल्याचे डॉक्टर शिवछंद यांनी सांगितले.




