नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका"
मुंबई (प्रतिनिधी) : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे रविवारी ICC Men's T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला. या विजयासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकत मोठी कामगिरी केली. देशभरात या विजयानंतर दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला.भारताच्या या शानदार विजयावर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही खास अंदाजात प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांचे हे ट्विट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले,“कहा था नहीं देखूंगा तो जीत जाएंगे! हो गया.” म्हणजेच, मी सामना पाहिला नाही म्हणून भारत जिंकला, असा हलक्याफुलक्या अंदाजात त्यांनी उल्लेख केला.अनेक क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच भारत जिंकावा म्हणून सामना न पाहण्याचं त्यांनी म्हटल्याचे या पोस्टमधून दिसून आले.
मात्र या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मजेत त्यांना “पनौती” असेही म्हटले. एका यूजरने लिहिले,“म्हणजे 2023 चा वर्ल्ड कप आपण तुमच्यामुळे हरलो का?” तर दुसऱ्याने लिहिले,“सर, पुढील 10 वर्षे तुम्ही टीव्हीच पाहू नका, आपण सगळे ट्रॉफी जिंकू!” काही चाहत्यांनी मात्र अमिताभ बच्चन यांना पाठिंबा देत लिहिले की, तेही भारत जिंकावा म्हणून सामना पाहत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टवर मजेशीर चर्चा रंगली आहे.
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक सक्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात. ते x माध्यमावर नियमितपणे अनेक पोस्ट करत असतात. त्यांच्या काही पोस्टचा अर्थ समजून घेण्यासाठी चाहत्यांना बरीच चर्चा करावी लागते.




