नैसर्गिक उपायांनी करा पांढऱ्या केसांवर मात ; घरच्या घरी बनवा 'हा' सुरक्षित हेअर डाय

नैसर्गिक उपायांनी करा पांढऱ्या केसांवर मात ; घरच्या घरी बनवा 'हा' सुरक्षित हेअर डाय

Health Tips News - आजकाल लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे. केस गळणे, तुटणे, फाटणे आणि पांढरे होणे या सर्व समस्या जीवनशैली, चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट, प्रदूषण, आहारातील बदल आणि अनुवंशिकता यामुळे वाढताना दिसतात. तरुण वयात केस पांढरे झाल्यावर अनेक महिला विविध केमिकलयुक्त रंग व ट्रीटमेंट्स वापरतात; मात्र वारंवार होणाऱ्या या प्रक्रियांमुळे केसांच्या मुळांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे योग्य पद्धतीने केसांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजणी मेहंदी किंवा हेअर डाय वापरतात. पण सतत मेहंदी लावल्याने केस कोरडे होणे, कोंडा वाढणे आणि केस गळती अशा समस्या अधिक उफाळून येऊ शकतात. म्हणूनच घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला हेअर डाय हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आज आम्ही असा एक सोपा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे पांढऱ्या केसांवर नियंत्रण मिळवता येईल आणि केस अधिक मुलायम व चमकदार बनतील.

नैसर्गिक हेअर डायसाठी लागणारे साहित्य :

- मोहरीचे तेल

- हळद

- कॉफी पावडर

- व्हिटॅमिन ई कॅप्सूल

- लिंबाचा रस

नैसर्गिक हेअर डाय बनवण्याची कृती - 

सर्वप्रथम लोखंडी कढईत मोहरीचे तेल गरम करा. त्यात हळद घालून काही वेळ मिक्स करा. नंतर कॉफी पावडर टाकून सतत ढवळत राहा. मिश्रण नीट एकजीव झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण तयार झाल्यावर ते रात्रभर झाकून ठेवावे.

हेअर डाय केसांना असा लावा - 

डाय लावण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर हेअर डाय मुळांपासून ते टोकापर्यंत नीट लावा. साधारण ३० - ४० मिनिटे तसेच ठेवून नंतर पाण्याने केस धुवा आणि शॅम्पूचा वापर करून स्वच्छ करा.

हा नैसर्गिक हेअर डाय आठवड्यातून एकदा वापरल्यास पांढऱ्या केसांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर कोरडेपणा, कोंडा आणि केसगळती अशा समस्या देखील कमी होतात. केमिकल नसल्यामुळे केसांच्या मुळांना नुकसान न होता केस अधिक सुंदर आणि निरोगी दिसतात.

पांढऱ्या केसांच्या समस्या जर अधिक होत असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.