पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका! दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजी दरवाढीची शक्यता

पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक झटका! दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजी दरवाढीची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल लिटरमागे 90 पैशांनी महाग होऊन 108.49 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल लिटरमागे 94 पैशांनी महाग होऊन 95.02 रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर चार रुपयांपेक्षा जास्त महागले आहे. यासोबत सीएनजीच्या दरातही वाढ होण्याची संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजीचा प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

यापूर्वी गेल्या आठवड्यात 15 मे आणि 19 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. काही दिवसांपूर्वीच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेच इंधन दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे.

मुंबई पेट्रोल आणि डिजेल दर : पेट्रोल- 108.45,डिझेल-95.02

कोल्हापूर पेट्रोल आणि डिजेल दर : पेट्रोल- 109.30,डिझेल-  95.89

सोलापूर पेट्रोल आणि डिजेल दर : पेट्रोल- 109.14,डिझेल-  95.74

नागपूर पेट्रोल आणि डिजेल दर : पेट्रोल- 108.97,डिझेल-  95.58

रत्नागिरी पेट्रोल आणि डिजेल दर : पेट्रोल - 110.44,डिझेल - 97.01

पुणे पेट्रोल आणि डिजेल दर :  पेट्रोल 108.76 , डिझेल - 94.40