"भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आलाय!" अमित साटमांच्या विधानावर राज ठाकरे भडकले; फडणवीसांच्या मौनावर उठवले सवाल !

"भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आलाय!" अमित साटमांच्या विधानावर राज ठाकरे भडकले; फडणवीसांच्या मौनावर उठवले सवाल !

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय पत्रयुद्ध चांगलंच पेटलं आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केलेल्या विधानावर राज ठाकरे प्रचंड संतापले आहेत. "भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आलाय आणि तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय," अशा अत्यंत तिखट शब्दांत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर पोस्ट करत एक खुले पत्र लिहिले आहे.

राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर बोट ठेवत त्यांना जाहीर इशारा दिला आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हंटलंय ?:

  • सत्तेचा माज आणि संसर्ग: राज ठाकरे पत्रात म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे देशातील लोक सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकांच्या वागण्याचा राग लोकांच्या मनात होताच, पण आता हा संसर्ग आपल्या राज्यापर्यंत पोहोचला आहे आणि देवेंद्रजी तुम्ही तो पसरू देताय?"
  • महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली: देशात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक उमदेपणा होता. पण गेल्या काही वर्षांत आपली बरोबरी उत्तरेकडील मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.
  • बाळासाहेब, पवार आणि महाजनांचा दिला संदर्भ: मी गेली ३७ वर्षे राजकारणात सक्रिय आहे. बाळासाहेब ठाकरे असोत, शरद पवार असोत की प्रमोद महाजन; महाराष्ट्रात आधी स्वपक्षाच्या नेत्याकडून चूक झाली तर त्यावर पांघरूण घातलं जात नव्हतं. पण आज 'हा आपला माणूस आहे' म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहत आहात आणि यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
  • फडणवीसांच्या मौनावर सवाल: "तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, तुमचे नेते असंवेदनशीलता दाखवत आहेत, तरीही तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?" असा थेट सवाल राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला आहे.

राज ठाकरेंनी फडणवीसांना सल्ला दिला आहे की, अशा बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही तातडीने राजीनामे घ्यायला हवेत. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्या, म्हणजे सगळे सुतासारखे सरळ येतील. आता राज ठाकरेंच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.