भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची फेरनिवड जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विजय जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. जाधव हे मागील 30 वर्षांपासून पक्षात सक्रिय असून, त्यांनी विविध जबाबदाऱ्यांची यशस्वीपणे पूर्तता केली आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रथमच महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. त्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्षाची घडी अधिक भक्कम केली असून, विविध उपक्रम राबवून शहरात पक्षाचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
गेल्या महिन्यात दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर महानगर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा रखडली होती. त्यामुळे या पदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज पक्षातर्फे विजय जाधव यांचीच फेरनिवड जाहीर करण्यात आली.
यावेळी विजय जाधव म्हणाले, "मी गेली अनेक वर्षे पक्षात निष्ठेने काम करत आहे. गेल्या दोन वर्षांत अध्यक्ष म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग करून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला, याचा मला अभिमान वाटतो."