भारतात टी - २० वर्ल्ड कप खेळण्यास बांगलादेशचा ठाम नकार ; आयसीसीचा इशारा धुडकावला
Cricket News Updates - भारतामध्ये होणाऱ्या टी - २० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यास बांगलादेश सरकारनं स्पष्ट नकार दिला आहे. आयसीसीनं भारतातच सामने खेळावे लागतील, असा इशारा दिला असतानाही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आहे. बांगलादेश सरकारच्या निर्णयानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (बीसीबी) सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने श्रीलंकेत खेळवावेत, अशी मागणी यापूर्वीच केली होती. या प्रकरणी आयसीसी आणि बीसीबी यांच्यात चर्चा झाली होती. बीसीबीला २१ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, भारतात टी - २० वर्ल्ड कप खेळण्यास नकार देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर बीसीबीनं हा प्रतिष्ठेचा मुद्दा करत सामने श्रीलंकेत घेण्याची भूमिका घेतली होती. यासोबतच बांगलादेशनं आयसीसीकडे गट बदलण्याचीही मागणी केली होती. मात्र, आयसीसीनं बांगलादेशच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुरक्षेच्या कारणांमुळं भारतात सामने न खेळण्याचा निर्णय बांगलादेश सरकारनं घेतला असून, तो बीसीबीचा स्वतंत्र निर्णय नाही. बीसीबीच्या प्रतिनिधींनी टी - २० वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेतच खेळवावेत, असा आग्रह धरला असला तरी आयसीसीनं त्याला नकार दिला आहे.
दरम्यान, बांगलादेशनं टी - २० वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन करत असून पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार आहेत.
दुसरीकडे, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात सोशल मीडियावर मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान यांना ट्रोल करण्यात आलं होतं. केकेआर संघात बांगलादेशचा क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमान असल्यामुळे शाहरुख खान यांच्याविरोधात पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. याची दखल घेत बीसीसीआयनं केकेआरला मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच बीसीबीनं भारतात टी-२० वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला.
या निर्णयामुळे आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमधील सहभागातून मिळणारी आर्थिक रक्कम बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मिळणार नाही. याशिवाय आयसीसीकडून आर्थिक दंडाची कारवाई होण्याची शक्यता असून बीसीसीआयविरोधात भूमिका घेतल्यानं बांगलादेशचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




