मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करूया-भैया माने

मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करूया-भैया माने

कागल (प्रतिनिधी): दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. हा वाढदिवस कै.अजितदादा पवार यांना अपेक्षित असलेल्या रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम व स्पर्धा अशा समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करूया, असेही ते म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीत भैय्या माने बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू  होते.ते म्हणाले, उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या वाढदिनी कुणीही शुभेच्छा दर्शक डिजिटल बोर्ड अथवा बॅनर लावू नका.

या बैठकीत पत्रकार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केलेल्या आवाहनाचे वाचन केले. ते असे.

         आपणा सर्वांना हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा सणाच्या आणि रमजान ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा......!

         गुरूवार दि. २६ मार्च रोजी म्हणजेच प्रभू श्री.रामनवमी दिवशी माझा वाढदिवस आहे. आपण हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने आणि समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून करावा, अशी विनंती माझ्या तमाम कार्यकर्त्यांना आहे.

        आज वाढदिवस समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी आपली सर्वांची बैठक बोलावलेली आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल, राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींच्या वाढदिवसाच्या तारखा कै. अजितदादा पवार यांच्याकडे असायच्या. भल्या सकाळी साडेसहा - सातलाच त्यांचा फोन खणाणायचा. "वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेनी मेनी हॅपी रीटर्न ऑफ धिस डे" अशा शुभेच्छा ते सर्वांना द्यायचे. आता येत्या श्री.रामनवमीला साडेसहा -सात  वाजता मला हा फोन येणार नाही. यापुढे हा आवाज आपल्याला कधीच ऐकायला येणार नाही. याचे फार मोठे शल्य, दुःख आणि वेदना माझ्या हृदयात आहेत. 

           त्यामुळे या वाढदिवसाला त्यादिवशी आपण सर्वांनी कुठेही बॅनर, डिजिटल बोर्ड लावू नयेत,  अशी माझी विनंती आहे. लोकनेते कै. अजितदादा पवार यांना आवडत असलेले फक्त समाजोपयोगी उपक्रम जसे कि, वृक्षारोपण, रक्तदान, गरीब लोकांना अन्नदान, रुग्णांना फळेवाटप,  शैक्षणिक स्पर्धा आपण आपल्या गावात आयोजित  करावेत.  अशाप्रकारे आपण माझा वाढदिवस कै. अजितदादांच्या  विचारांनी समाजोपयोगी विधायक सामाजिक उपक्रम आणि साध्या पद्धतीने  साजरा करा. 

            या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी दुसरे दोन संकल्प केले आहेत.  माझ्या कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील "मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना" आणि "प्रधानमंत्री सूर्यघर योजना" प्रभावीपणे राबविण्याचे हे संकल्प आहेत.

        यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत गवळी, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, शशिकांत खोत, दलितमित्र बळवंतराव माने, संजय चितारी, राजेंद्र माने, सूर्याजीराव घोरपडे, प्रवीणसिंह भोसले, सुनीलराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, पंचायत समिती उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, आजरा पंचायत समितीचे सदस्य विकास चोथे, गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश सलवादे, उदय परीट, नागेश चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.