महापालिकेच्या वतीने शहरातील नाले सफाई मधून 45 हजार 500 टन गाळ उठाव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापूर्वी 60 फुटी बुम (पोकलँड), पोकलँड मशीन, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात आली आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 45 हजार 500 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पुर्ण करण्यात आले आहे.
यावर्षी नालेसफाई जलदगतीने व खोलवर करण्यात आल्याने शहरामध्ये कुठेही नाल्याचे पाणी शिरले नाही. या नालेसफाईवेळी मे महिन्यात व जूनमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडून व्यत्यय येऊनही महापालिकेने भर पावसात युध्द पातळीवर हे काम पूर्ण केले आहे. शहरामध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडून राजाराम बंधारा येथे 50 टनापेक्षा जास्त फ्लोटिंग मटेरियल वाहून आले होते. सदरचे सर्व मटेरियल एका दिवसात महापालिकेने नदीतून बाहेर काढले. सदरचे फ्लोटिंग मटेरियल हे नाल्यातील नसून नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील वाहून जयंती नाल्यामध्ये आल्याने ते वाहत आले होते.
महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 60 कर्मचाऱ्यांमार्फत 471 लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने 225 मध्यम नाले व चॅनल सफाई करण्यात येत आहे. पोकलॅण्ड मशीनद्वारे 3 आणि 60 फुटी बुम पोकलॅण्ड द्वारे मोठया 3 नाल्यापैकी अत्यंत अडचणीच्या व खोल असलेल्या भागामध्ये जाऊन गाळ उठाव करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी शहरामध्ये कोठेही नाले तुंबून पाणी शिरलेले नाही.
तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.