महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून वाद; अमित शहा यांनी केलं मोठं विधान

महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून वाद; अमित शहा यांनी केलं मोठं विधान

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसतानाही, पहिलीपासून हिंदी शिकवणं बंधनकारक केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलं असून, मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरातील शाळांना पत्रक देत इशारेही दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हिंदी भाषेबाबत ठळक विधान केलं आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना अमित शहा म्हणाले, "हिंदीवर कोणतंही संकट नाही. लक्षात ठेवा, आपल्या देशात लवकरच असा समाज तयार होईल की इंग्रजी बोलणाऱ्यांनाही लाज वाटेल."

शहा पुढे म्हणाले, "भारतीय भाषाच आपल्या देशाची खरी ओळख आहेत. त्या परकीय भाषांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीचे दागिने आहेत. या भाषांशिवाय आपण भारतीयच राहणार नाही. देशाचा इतिहास, धर्म, संस्कृती परकीय भाषांमधून समजू शकत नाही; त्यासाठी भारतीय भाषाच आवश्यक आहेत."

शहा यांनी असंही सांगितलं की, "मला माहिती आहे ही लढाई कठीण आहे, पण भारतीय समाज ही लढाई नक्कीच जिंकेल. भारत स्वतःच्या भाषांद्वारे विचार करेल, देश चालवेल, संशोधन करेल आणि जगाचं नेतृत्व करेल."

दरम्यान, अमित शहा यांच्या या विधानांवर दक्षिण भारतातील जनतेकडून काय प्रतिक्रिया येतील याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज ठाकरे आणि मनसेची भूमिका महाराष्ट्रात पुढे कशी घडते, यावरही राजकीय समीकरणं अवलंबून राहतील.