मायलेकी एकाचवेळी 10 वी पास; परीक्षेत दोघीही उत्तीर्ण, कुणाला किती गुण?
मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूर राज्यातील 10 वीच्या परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत कौतुकाची थाप मिळवलीय. तर, कुठे एखाद पठ्ठ्याने सर्वच विषयात 35 टक्के गुण मिळवत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पंढरपूर तालुक्यातील सूरज मलपेने 10 वी परीक्षेत सर्वच विषयात 35 टक्के गुण मिळवल्याने ग्रामस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. तर, पंढरपूरच्या शेजारीच असलेल्या अकलूज येथे मायलेकीने एकाचवेळी 10 वीची परीक्षा पास केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अकलूज येथील मायलेकीने एकाच वेळेस दहावीची परीक्षा देवून पास झाल्या आहे. मायलेकीने दोघींनी हे यश एकाचवेळी संपादन केल्यामुळे आई व मुलीवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षांव होत आहे.

अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी कु.लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने 500 पैकी 411 गुण म्हणजेच 82.20 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तर तिची आई सौ. पुजा नागनाथ क्षीरसागर यांनी वयाच्या 37 व्या वर्षी दहावीची परीक्षा देवून 500 पैकी 218 गुण म्हणजेच 43.60 टक्के मार्क्स घेऊन पास झाली आहे. आई व मुलीने एकाचवेळी दहावीची परीक्षा पास झाल्यामुळे मायलेकीचे अकलूज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पुजा नागनाथ क्षीरसागर या सध्या यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या 21 चारी जयसिंहनगर येथे सीआरपी पदावर कार्यरत आहेत.
जीवनाच्या प्रवासात त्यांना अपुऱ्या शिक्षणामुळे अडचणी येऊ लागल्याचे लक्षात येताच वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी बाहेरुन 10 वी बोर्डाची परीक्षा देऊन हे यश संपादन केले आहे. घरकाम आणि नोकरी करीत वेळ मिळेल तसा आपल्या मुलीसोबत त्यांनी अभ्यास केला होता. दरम्यान, मुलीनेही आईला अभ्यासात खूप मदत केली, आता आपल्या मुलीला इंजिनिअर करण्याचे आईचे स्वप्नं आहे, त्याष्टीने मुलीचा पुढील शैक्षणिक प्रवास सुरु होणार आहे.




