मुंबईतील KEM नामांतरावर ठाकरे गटातील दोन आमदारांचा विरोध; मंत्र्यांवर टीका, लोढांचा पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : गोरगरिब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरुन वाद उफाळला असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या नामांतरास विरोध करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार मिलिंद नार्वेकर आणि शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी विरोध दर्शवत आपली बाजू मांडली. त्यात, मिलिंद नार्वेकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केलीय. तर, अजय चौधरी यांनीही, मुंबई लोढाची झाली आहे असे म्हणत मराठीजनांना साद घातली. आता, ठाकरेंच्या शिवसेना विरोधावर विचारले असता, मंगलप्रभात लोढा यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिकृत पत्र लिहून ब्रिटीश काळातील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (KEM) हे नाव बदलून भारतीय संस्कृतीनुसार 'कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' असे करण्याचे सुचवले. विशेष म्हणजे, नवीन नावातूनही 'केईएम' हे संक्षिप्त रूप कायम राहील, असा दावा लोढा यांनी केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिल्याची माहिती समोर येताच वादाला तोंड फुटले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सूचवलेल्या नवीन नावाच्या प्रस्तावाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. तर या विरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक देखील देण्यात आली आहे. त्यावर, आता लोढा यांनी उत्तर दिले.
केईएमच्या नामांतरास विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या आमदारांनी सार्वजनिकरित्या सांगावे, आम्हाला किंग एडवर्ड आवडतात. देशात किंग एडवर्डची माळा का जपली जाते? इंग्लडमध्ये त्यांचे नाव ठेवावे, असे उत्तर मंगलप्रभात लोढा यांनी दिले. तसेच, केईएम डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेतली आहे, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. "केईएम रुग्णालयाचे नाव तुम्ही बदलत असाल तर इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?," असा बोचरा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर केईएममधील निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड'नेही या नामांतराला कडाडून विरोध केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांना आणि डॉक्टरांना विश्वासात न घेता असा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी भूमिका 'मार्ड'ने मांडली आहे. शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी समाजमाध्यमावर अत्यंत आक्रमक पोस्ट लिहीत मराठी माणसांना साद घातली आहे. "मराठी मनानो मराठी जनानो, गप गार थंड बसा. तुमची मुंबई तुमच्या हाती राहिली आहे का? ती तर लोढाची झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या नामांतराच्या निषेधार्थ केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या केबिनबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. "नाहीतर मुंबईचे लोढा मॅन्शन झालेच समजा," असा इशाराही त्यांनी दिला आहे.




