मृत व्यक्तीचं शव तिरडीवर ठेवत असतानाच असं काही घडलं अन्...

मृत व्यक्तीचं शव तिरडीवर ठेवत असतानाच असं काही घडलं अन्...

चंदीगड - हरियाणामधील यमुनानगर जिल्ह्यातील कोट माजरी गावात एक अजब आणि थरकाप उडवणारी घटना घडली आहे. 75 वर्षीय शेर सिंह यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. घरात शोककळा पसरलेली होती, तिरडी सजवली गेली, स्मशानभूमीत लाकडे पोहोचली होती,पण शेवटच्या क्षणीच काहीसा चमत्कार घडला. शव तिरडीवर ठेवताना अचानक शेर सिंह यांनी डोळे उघडले आणि श्वास घेण्यास सुरुवात केली. हे पाहून घरच्यांच्यासह उपस्थित सर्वजण थक्क झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले. काही क्षणांसाठी का होईना, पण मृत्यूनंतर शेर सिंह यांना पुन्हा जीवन मिळालं.

या घटनेमागची पार्श्वभूमी अशी की, काही दिवसांपासून शेर सिंह आजारी होते. यमुनानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितलं होतं की, त्यांची तब्येत अतिशय नाजूक आहे आणि ते फार काळ टिकणार नाहीत. त्यामुळे कुटुंबीय त्यांना घरी घेऊन गेले. रस्त्यातच त्यांनी श्वास सोडला. पुन्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

यामुळे घरात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. मात्र, चितेवर ठेवण्याच्या क्षणीच त्यांनी पुन्हा डोळे उघडले. यामुळे डॉक्टरही चकित झाले. तातडीने उपचार सुरू झाले, पण तीन तासांनी शेर सिंह यांचे खरेखुरे निधन झाले.

आधी मृत्यू, मग जीवन आणि पुन्हा मृत्यू या विचित्र अनुभवातून कुटुंबीयांना जबरदस्त भावनिक धक्का बसला. शेर सिंह यांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि रात्री उशिरा त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या संपूर्ण घटनेने 'मृत्यू नंतरचे जीवन' हे केवळ कल्पनेतच नाही तर वास्तवातही कधीकधी अनुभवता येते, हे दाखवून दिलं.